चांदूर रेल्वे,
flower-shower-from-a-jcb : जिल्हा परिषद शाळांविषयी पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी चांदुर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शाळा प्रवेशोत्सवात अनोख्या पद्धतीने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय ठरला. याच पद्धतीने जिल्ह्यातल्या अन्य शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे वेगवेगळे कार्यक्रम झाले.

चांदूरवाडीत कार्यक्रमाच्या प्रारंभी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ‘आम्ही शाळेला जाऊ, आम्ही शिकून मोठे होऊ‘, ‘जिल्हा परिषद शाळा आमची शाळा’, ‘शिक्षण आमचा ध्यास, जिल्हा परिषद शाळा आमची खास’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावकऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश दिला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते जेसीबीमधून करण्यात आलेली पुष्पवृष्टी. या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला, तर पालक आणि ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. यावेळी विभागीय उपायुक्त प्रवीण मानकर, उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, गटविकास अधिकारी राणी माळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय खारकर, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, गटसमन्वयक मंगेश उल्हे, उपसरपंच सोनू शेख, विषयतज्ज्ञ निखिल दानापूरकर, विवेक राऊत तसेच रेखा वडतकर यांच्यासह अन्य शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार विषय शिक्षक सचिन वावरकर यांनी मानले.