रिसोड,
shri gajanan maharajs palkhi श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ३० जून रोजी रिसोड नगरीत आगमन झाले. गण गण गणात बोते च्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या निनादाने संपूर्ण रिसोड नगरी भक्ती भावाने न्हाहून निघाली. पालखीच्या आगमनाने रिसोड नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पंचक्रोशीतील गावामधून हजारो भाविक भक्तांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मालेगाव मार्गावरून दुपारी २ वाजता पालखीचे रिसोड नगरीत आगमन झाल्यानंतर चाफेश्वर चौक, लोणी फाटा, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हिल लाईन्स मार्गे सायंकाळी ६ वाजता पालखी कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे पोहोचली. पालखी मार्गावर भाविक भक्तांनी स्वागत कमानी उभारून, रांगोळी काढून व फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. विविध सामाजिक संस्थांनी वारकरी भक्तांना जीवनाशक वस्तूंचे वाटप केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ, खरेदीदार व आडते असोसिएशन, हमाल व मापारी संघटना यांचे तर्फे पालखीचे स्वागत करून महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. पालखी दरम्यान ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. १ जुलै रोजी सकाळी ५ वाजता पालखी सेनगाव कडे रवाना झाली.