एफएटीएफमध्ये पुन्हा पाकभोवती ‘ग्रे लिस्ट’चा फास?

भारताचा मोठा डाव

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
grey list is hanging over Pakistan दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उघड करण्यासाठी भारताने मोठी रणनीती आखली आहे. स्वतःला ‘शांततादूत’ म्हणून सादर करणाऱ्या पाकिस्तानचे खरे स्वरूप जगासमोर आणण्यासाठी भारत आता ठोस पुरावे सादर करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या महत्त्वपूर्ण बैठकीत भारत पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या भूमीवर सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना तेथील प्रशासन आणि यंत्रणांकडून मिळणारा पाठिंबा सिद्ध करण्यासाठी भारताकडे अनेक महत्त्वाचे पुरावे उपलब्ध आहेत. यामध्ये व्हिडिओ फुटेजसह विविध दस्तऐवजांचा समावेश असून, पाकिस्तानचा दहशतवादाशी असलेला संबंध स्पष्ट करण्यावर भारताचा भर असेल.
 
 
 Pakistan
 
यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारांमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यातून दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भारत या पुराव्यांच्या आधारे एफएटीएफसमोर पाकिस्तानला पुन्हा ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी करू शकतो. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून वगळण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानने ३४ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवल्याचा दावा केला होता. या आराखड्यात दहशतवादी निधीवर नियंत्रण ठेवणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता.
 
 
मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे पाकिस्तानने दिलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर पाकिस्तानला पुन्हा एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये स्थान मिळाले, तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत जागतिक वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवणे कठीण होईल, तसेच त्या देशाच्या आर्थिक व्यवहारांवर अधिक कठोर देखरेख ठेवली जाईल. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळे ऑक्टोबरमधील एफएटीएफ बैठक पाकिस्तानसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून, भारताच्या पुढील पावलांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.