मुंबई,
Heavy rain alert for the state राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले असून, महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर कोकण पट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि पवई परिसरात धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरात पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे.विदर्भातही मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत आहेत. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातही पावसाची स्थिती बदलत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. कृषी विभागाने 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन वारंवार केले होते. तरी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नागपूर जिल्ह्यातील कुही, भिवापूर आणि उमरेड तालुक्यांत अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र पावसाने पुन्हा उसंत घेतल्याने अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.नागपूरमध्ये 30 जून रोजी सायंकाळी झालेल्या मध्यम ते जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. विशेषतः सिव्हिल लाईन्स परिसरात आणि महापालिकेच्या आवारातही बराच वेळ पाणी साचल्याने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र अलीकडील पावसानंतर जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यंदा हिंगोली जिल्ह्यात सुमारे 4 लाख 7 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे आणि बैलजोडीच्या मदतीने शेतात पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पावसाच्या नियमिततेकडे लक्ष ठेवून आहेत. आगामी काही दिवसांत पाऊस सातत्याने बरसल्यास पिकांची उगवण चांगली होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.