कोलकाता
High Court setback for Mamata Banerjee पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पक्षाच्या तीन बँक खात्यांवरील डेबिट फ्रीझ हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी या प्रकरणाची सुनावणी नियोजित क्रमानेच होईल, असे स्पष्ट करत तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे टीएमसीला तात्काळ दिलासा मिळालेला नाही.
तृणमूल काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील किशोर दत्ता यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, पक्षाच्या तीन बँक खात्यांवर डेबिट फ्रीझ लादण्यात आले आहे. यामुळे खात्यांमधून होणारे सर्व बाह्य व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ४४० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई काही बंडखोर आमदारांच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. संबंधित आमदारांनी पक्षाच्या खात्यांमध्ये जमा झालेल्या निधीच्या स्रोतावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करून आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची विनंती केली आहे.तक्रारीत खात्यांमध्ये जमा झालेला निधी कायदेशीर स्रोतांमधून आला आहे की कथित ‘कट मनी’, सार्वजनिक निधीचा गैरवापर किंवा इतर आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित आहे, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या घडामोडीनंतर टीएमसी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.