सुट्ट्या संपल्या शाळा सुरू!

१४५४ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
वर्धा,
holidays are overschool has started उन्हाळ्याच्या सुट्ट्यांवर कडक उन्हाळ्यातील १५ दिवसांच्या बोनस सुट्ट्या मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद होता. त्याच आनंदात शाळेच्या पहिल्या दिवशी आज ३० रोजी विद्यार्थ्यांचा शाळांमध्ये प्रवेशोत्सव झाला. लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता जोरदार तयारी केली होती. जिल्ह्यातील १,४५४ शाळांमध्ये पहिली घंटा वाजली.
 
 
holidays are overschool has started
 
जिल्ह्यात शाळा साधारणपणे १५ जून रोजी सुरू होतात. यावर्षी, तीव्र उष्णतेमुळे शाळा ३० जून रोजी सुरू झाल्या. दरम्यान, सीबीएससी शाळांनी कोरोना काळाप्रमाणे ऑनलाईन वर्ग घेत आपला अभ्यासक्रम सुरू ठेवला होता. शाळेच्या पहिल्या दिवशी, लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय आणि तहसीलस्तरीय अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १०० शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत शाळेची स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, उपलब्ध क्रीडा साहित्य, क्रीडा सुविधा, पोषण शक्ती आहार योजना आणि निपुण महाराष्ट्र अभियान यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी शाळांनी तयारी केली होती. शाळेच्या परिसरात विविध सजावट आणि रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
आर्वी येथे खासदार अमर काळे यांच्यासह जिल्हाधिकारी वन्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपविभागीय दंडाधिकारी गणेश खटाले, अनिल गवीत आणि श्रीपती मोरे यांनी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
 
 
पुस्तकं आणि गणवेशाचे वाटप
समग्र शिक्षा अभियानांतर्गत ८८ हजार ५१२ विद्यार्थ्यांना ४ लाख ४६ हजार ७८७ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ४१ हजार ३४० विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.