तिरुप्पूर,
Home delivery based on a YouTube video तामिळनाडूतील तिरुप्पूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 32 वर्षीय महिलेचा गंभीर गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला आहे. 28 जून 2026 रोजी प्रसूतीनंतर झालेल्या रक्तस्रावामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. उथुकुली तालुक्यातील पुंजैथलवैपालयम येथील रहिवासी के. शशिकला यांनी 24 जून रोजी घरीच बाळाला जन्म दिला होता. प्रसूतीसाठी त्यांच्या पतीने आणि सासूने यूट्यूबवर नैसर्गिक प्रसूतीसंबंधी व्हिडिओ पाहून मदत केल्याचे समोर आले आहे. प्रसूतीदरम्यान तिने एका मुलीला जन्म दिला.
मात्र बाळ जन्मल्यानंतर हिलेची प्रकृती बिघडू लागली आणि तिला मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर तिला तातडीने पेरुंदुराई येथील सरकारी इरोड मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी 25 जून रोजी तिला कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे काही दिवस उपचार सुरू राहिले, परंतु अखेर 28 जून रोजी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूतीनंतर झालेला गंभीर रक्तस्राव (पोस्ट-पार्टम हेमोरेज) हा मृत्यूचे प्रमुख कारण ठरला. या प्रकरणात ब्लॉक मेडिकल ऑफिसरच्या तक्रारीवरून पती कोलंदाचामी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याला आधीपासूनच सहा वर्षांची मुलगी आहे. पहिल्या प्रसूतीदरम्यान शशिकला यांची सिझेरियन शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे पुढील प्रसूती नैसर्गिक पद्धतीने घरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र वैद्यकीय सल्ला न घेता यूट्यूबवरील माहितीवर अवलंबून राहिल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.