ऑलिम्पिकमध्ये भारत-पाक सामना अनिश्चित

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India-Pakistan match in Olympics uncertain १२८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये टी-२० स्वरूपात क्रिकेट सामने खेळले जाणार आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांनी जाहीर केलेल्या पात्रता नियमांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना होण्याची शक्यता सध्या तरी अनिश्चित झाली आहे.या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही गटांत प्रत्येकी फक्त सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील. सामने लॉस एंजेलिसमधील पोमोना येथे उभारण्यात येणाऱ्या विशेष क्रिकेट मैदानावर खेळवले जाणार आहेत. मर्यादित संघसंख्येमुळे पात्रतेची लढत अत्यंत तीव्र होणार आहे.
 
 
भारत विरुद्ध पाकिस्तान
पुरुष गटात सहा स्थानांसाठी नियम ठरवण्यात आले आहेत. यापैकी पाच संघांना थेट पात्रता मिळेल, तर सहावे स्थान २०२७ मध्ये होणाऱ्या पहिल्या आयसीसी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील विजेत्यास दिले जाईल. यजमान देश म्हणून अमेरिकेसाठी एक स्थान राखीव आहे, मात्र त्यासाठी त्यांना ३० जून २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ दरम्यान आयसीसी टी-२० क्रमवारीत किमान एकदा अव्वल १५ मध्ये स्थान मिळवणे बंधनकारक असेल.नियमांनुसार, आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशेनिया या चार खंडांतून प्रत्येकी एक संघाला थेट प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे आशियातील केवळ अव्वल क्रमांकाचा संघच थेट ऑलिम्पिक पात्र ठरेल.
 
याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. जर भारताने आशियाई क्रमवारीत अव्वल ठरला, तर पाकिस्तान यांना २०२७ च्या पात्रता स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. या पात्रता फेरीत आठ संघ सहभागी होतील, ज्यामध्ये खंडीय कोट्यातून थेट पात्र न ठरलेल्या सर्वोच्च क्रमांकाच्या संघांचा समावेश असेल.ही पात्रता स्पर्धा जिंकणारा संघच ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवू शकणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला थेट पात्रता न मिळाल्यास भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आणखी कमी होईल.सध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार, जर २०२६ अखेरीस पाकिस्तान भारताच्या मागे राहिला, तर त्यांना पात्रता फेरी खेळावी लागेल. त्या फेरीत अपयश आल्यास पाकिस्तान ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवू शकणार नाही. परिणामी, लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता सध्या धूसर झाली आहे.