अफगाणिस्तानवरील हल्ला अकारण आणि गंभीर!

भारताने पाकिस्तानला फटकारले

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India rebukes Pakistan अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत या कारवाईचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. भारताने हा हल्ला अकारण आणि गंभीर स्वरूपाचा असल्याचे म्हटले असून, त्यामुळे संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि स्थैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तानच्या कारवाईवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने भारताने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केले. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले की, अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा भारत तीव्र शब्दांत निषेध करतो, ज्यात महिला आणि मुलांसह अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानची ही उघड आक्रमकता अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आणि प्रादेशिक शांतता व स्थिरतेला थेट धोका आहे.
 

India rebukes Pakistan 
 
 
भारताने पुढे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानचे हे पाऊल केवळ बेजबाबदार वर्तन नसून, स्वतःच्या अंतर्गत अपयशाचे खापर बाह्य घटकांवर फोडण्याचा प्रयत्न असल्याचेही भारताने नमूद केले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, हे पाकिस्तानचे सततचे बेजबाबदार वर्तन आणि आपल्या सीमेबाहेर हिंसक कृत्ये करून आपल्या अंतर्गत अपयशाचे खापर बाह्य घटकांवर फोडण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न दर्शवते. दरम्यान, पाकिस्तानने सोमवारी २९ जून रोजी दावा केला की, त्यांच्या सुरक्षा दलांनी अफगाण सीमेजवळ २९ दहशतवाद्यांना ठार केले आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला असून, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने एकमेकांच्या राजनैतिक प्रतिनिधींना बोलावून निषेध नोंदवला आहे.
 
 
 
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये गंभीर आरोप करत म्हटले की, पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमध्ये निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह ३६ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १६३ जण जखमी झाले. अफगाणिस्तानने या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे, मानवतावादी तत्त्वांचे आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या गंभीर आरोपांवर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही याकडे बारकाईने पाहिले जात आहे.