नवी दिल्ली,
Indian women's team announced २०२६ आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून निवड समितीने काही महत्त्वाचे आणि चर्चेत राहणारे निर्णय घेतले आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटियाला संघातून वगळण्यात आले असून या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे, तर स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. टी-२०विश्वचषकातील कामगिरीनंतर संघात काही बदल अपेक्षित होते आणि त्याच पार्श्वभूमीवर यास्तिका भाटियाला वगळण्यात आले आहे. तिने विश्वचषकात तीन सामन्यांमध्ये केवळ ४१ धावा केल्या होत्या, ज्यामुळे तिच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दुसरीकडे, जेमिमा रॉड्रिग्जचा फॉर्मही फारसा प्रभावी नसतानाही तिचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या संघात अष्टपैलू श्रेयंका पाटीलचाही समावेश करण्यात आला आहे, मात्र ती सध्या दुखापतीतून सावरत असल्याने तिची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून असेल. २०२६ च्या टी२० विश्वचषकादरम्यान तिला पायाला दुखापत झाली होती. भारतीय महिला संघाला अलीकडील टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भारताने १७० धावा केल्या होत्या, मात्र ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावत सहज विजय मिळवला होता. एलिस पेरीने ५६ आणि ॲशले गार्डनरने नाबाद ५३ धावा करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला होता. भारताने 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ११६ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात श्रीलंका ९७ धावांवर बाद झाला होता. त्या स्पर्धेत जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक १०९ धावा केल्या होत्या. २०२६ च्या संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी. कमलिनी, भारती फूलमली, श्री चरणी, रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, नंदिनी शर्मा आणि राधा यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.