अनिल कांबळे,
नागपूर,
kasturchand-park : ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदान सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे आणि ते क्रीडा तसेच सार्वजनिक मैदान म्हणून वापरण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली.
निशांक उदेश नायक या विद्यार्थ्याने ही जनहित याचिका दाखल केली असून राज्य सरकार, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित प्राधिकरणांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
याचिकेनुसार, कस्तुरचंद पार्क हे शंभर वर्षांहून अधिक काळापासून क्रीडा उपक्रमांसाठी वापरले जात आहे. शासनाच्या नोंदींमध्येही या मैदानाची नोंद सार्वजनिक खेळाचे मैदान म्हणून असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मैदानावर विविध क्रीडा उपक्रम सुरू होते. मात्र त्यानंतर प्रवेशद्वारे बंद करून सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मैदानात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला.
त्यामुळे नागरिकांना धावणे, चालणे, व्यायाम करणे आणि विविध खेळ खेळणे अशक्य झाले आहे. याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की, यापूर्वीच्या जनहित याचिकेत न्यायालयाने सर्वसामान्यांना मैदान वापरण्यास मनाई करणारा कोणताही आदेश दिलेला नव्हता. तरीही प्रशासनाने मनमानीपणे मैदान बंद ठेवले असून नागरिकांच्या सार्वजनिक वापराच्या हक्कावर गदा आणली आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित प्रशासनाला कस्तुरचंद पार्कचे प्रवेशद्वार खुले करण्याचे आणि सर्वसामान्य नागरिकांना क्रीडा व सार्वजनिक वापरासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर, मंगळवारी ३0 जून रोजी सुनावणी होणार आहे.