सियाच्या भावाला वकिलाकडून 10 कोटींची नोटीस

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
पुणे,
Lawyer issues notice to Sia's brother पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक नवे आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयलभोवती सुरू असलेल्या तपासादरम्यान आता कायदेशीर संघर्षही तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे, सियाचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणारी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सोमवारी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी न्यायालयात सियाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या नावावर अधिकृत वकीलपत्र नसल्याची बाब आधीपासूनच चर्चेत होती. या सर्व घडामोडींमध्ये मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा सिया गोयलने न्यायालयात स्पष्ट शब्दांत सांगितले की, "माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत." सियाच्या या वक्तव्यानंतर न्यायालयातील वातावरणच बदलले. या खुलाशामुळे अ‍ॅड. श्रीवास्तव यांना कोर्टातून माघार घ्यावी लागली.
 
 

goyal brother 
 
या घटनेनंतर वाद आणखी चिघळला. अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलवर गंभीर आरोप करत त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. साहिल गोयलने आपल्यावर खोटे, निराधार आणि बदनामीकारक आरोप केले असून त्यामुळे आपल्या व्यावसायिक प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी साहिल गोयलला 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस बजावली आहे. तसेच, साहिलने केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत, पुढील 48 तासांत सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोप पुन्हा करणार नाही, याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी स्पष्ट अटही नोटिशीत नमूद करण्यात आली आहे.केतन अग्रवाल हत्या प्रकरण आधीच राज्यभर चर्चेचा विषय ठरले असताना आता या नवीन कायदेशीर संघर्षामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पुढील काही दिवसांत या वादात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.