गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला गती

- जिल्हास्तरीय समितीची स्थापना

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
गोंदिया, 
loan-waiver-scheme : शेतकर्‍यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा यासाठी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमुळे योजनेच्या अंमलबजावणीला अधिक वेग आणि शिस्त मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
loan-waiver-scheme
 
 
 
गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तसेच व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अर्चना माळवे या सदस्य सचिव म्हणून समितीचे कामकाज पाहणार आहेत. समिती कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समन्वय साधणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करणे, अपात्र घटकांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे तसेच आधारशी जोडणी न झालेल्या कर्जखात्यांची माहिती प्रसिद्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. शेतकर्‍यांची अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण सुलभ करण्यासाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, योजनेबाबत व्यापक जनजागृती करून अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, बँका व संबंधित विभागांमध्ये समन्वय राखणे आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असणार आहे. या समितीच्या स्थापनेमुळे कर्जमुक्ती प्रक्रियेला गती मिळून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.