देवळी,
mla rajesh bakane मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य, शेतकरी आणि विकासाशी संबंधित प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही पुरेसा वेळ दिला जात नसल्याने आ. राजेश बकाने यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. मी सभागृहात रिल बनवण्यासाठी नाही तर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी उभा आहे, असे ठणकावले. आ. बकाने म्हणाले की, जनतेने आपल्याला विधानसभेत पाठविले ते प्रसिद्धीसाठी नव्हे तर त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी. मात्र, मतदारसंघातील गंभीर प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने जनतेचा आवाज दाबला जात आहे. लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा समान अधिकार आहे आणि तो अधिकार हिरावला जाणे ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुलगाव येथे महिला व शिशु रुग्णालयाची स्थापना, ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर, सिंचन प्रकल्प, पीक विमा, वीज पुरवठा, शेतीसाठी आवश्यक सुविधा आणि विविध विकासकामांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. परंतु, बोलण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नसल्याने जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात असल्याची खंत त्यांनी व्यत केली.
आज काही जण सभागृहातील भाषणांच्या रिल्स आणि प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहेत. पण, आपल्यासाठी हे सभागृह जनतेच्या न्यायाचे व्यासपीठ आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविणे हीच माझी प्राथमिक जबाबदारी आहे. प्रसिद्धीपेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे सांगत त्यांनी सरकारकडेही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यत केली. देवळी-पुलगावच्या जनतेच्या आरोग्य, शेतकरी आणि विकासाच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सभागृहात वेळ मिळो अथवा न मिळो, जनतेच्या हक्कासाठी आपण सातत्याने संघर्ष करत राहू, असे ते म्हणाले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात चर्चा रंगली.