अनिल कांबळे,
नागपूर,
murder-case : सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या प्रेयसीचा अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय याचा नियमित जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांनी नाकारला आहे.
३२ वर्षीय युवती संजना (काल्पनिक नाव) ही २८ ऑगस्ट २०२४ रोजी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरातून निघाली होती, मात्र ती परतली नाही. सुरुवातीला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर संशय बळावल्याने १८ सप्टेंबर २०२४ रोजी बेलतरोडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास चक्र फिरवत १८ ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपीला अटक केली. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीचे संजनासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, अजयचे लग्न झाले होते ही गोष्ट त्याने संजनापासून लपवून ठेवली होती. संजना ही अजयकडे लग्नासाठी सतत तगादा लावत होती. याच कारणावरून अजयने तिचा काटा काढण्याचे ठरवले आणि तिचा निर्घृण खून केला.
स्वत:चा मोबाईल ठेवला घरी
सरकारी वकील आणि तपासातून समोर आलेले पुरावे अत्यंत धक्कादायक आहेत.आरोपी अजयने गुन्ह्याच्या वेळी लोकेशन मिळू नये म्हणून स्वत:चा मोबाईल घरीच ठेवला आणि आईचा मोबाईल सोबत घेतला, जेणेकरून त्याचे लोकेशन घटनास्थळी दिसणार नाही आणि तो घरीच झोपला होता असा बनाव करता येईल. गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने संजनाचा मोबाईल हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. हा मोबाईल पुढे तेलंगणा येथे सापडला. ओळख पटू नये म्हणून त्याने संजनाचे कपडे काढून जाळून टाकले आणि मृतदेह एका निर्जन स्थळी पुरला. आरोपीच्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, ज्याची ओळख तिच्या हातातील धाग्यावरून पटली. घटनेच्या वेळी अजय नागालँडमध्ये तैनात होता, पण तो कोणालाही न सांगता नागपूरला आला. गुन्ह्यानंतर तो लष्करी रुग्णालयात दाखल झाला, मात्र पोलिसांचा सुगावा लागताच तिथूनही फरार झाला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, हा खटला केवळ संशयावर आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. मृतदेहाची डीएनए चाचणी झालेली नाही आणि आरोपीला उशिरा अटक करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद नाकारला. न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपी लष्करात असल्याने त्याला कायद्याची माहिती होती. लोकेशन लपवण्यासाठी आईचा मोबाईल वापरणे, गुन्ह्यानंतर लष्करी रुग्णालयातून पळून जाणे आणि आरोपीच्या सांगण्यावरूनच निर्जन ठिकाणाहून मृतदेह आणि खुनासाठी वापरलेला दगड जप्त होणे, या सर्व बाबी अजयविरुद्ध भक्कम साखळी पुरावा तयार करतात. हा एक पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नाकारला. या प्रकरणात आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(१), १४०(३), १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सरकारतर्फे ॲड. नीरज जवादे यांनी बाजू मांडली.