नवी मुंबई,
transfers-of-senior-police-inspectors : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव अत्यंत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहरातील १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत या सर्व बदल्या करण्यात आल्या असून, या अंतर्गत बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयुक्त स्तरावरील मान्यतेनंतर हे आदेश लागू करण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजू होऊन तसा अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या मोठ्या फेरबदलामध्ये सानपाडा, खारघर, उरण, न्हावाशेवा, कामोठे, पनवेल शहर आणि रबाळे एमआयडीसी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
या अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली राहुल पाटील यांची आता उरण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न असलेले पोलीस निरीक्षक सुरज ज्ञानदेव पाटील यांच्याकडे आता खारघर पोलीस ठाण्याची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे यांची न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ज्योती बाळासाहेब देशमुख यांच्याकडे कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाची, तर बाळा रघुनाथ कुंभार यांच्याकडे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाची महत्त्वाची धुरा देण्यात आली आहे.
दुसरीकडे, तुर्भे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन शंकर कदम यांची गुन्हे शाखेच्या एएचटीयू (AHTU) विभागात बदली करण्यात आली असून, गुन्हे शाखेतीलच चेतनाराज चौधरी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आनंदा वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. या साखळीत न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हे मोठे आदेश काढले आहेत.