सिया-चेतननंतर आता साहिलची एन्ट्री!

केतन प्रकरणाला नवे वळण

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
पुणे,
New twist in the Ketan case राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 29 जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी आणखी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आता सियाचा भाऊ साहिल गोयल याच्याभोवती तपासाची चक्रे फिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, क्रिकेटच्या माध्यमातून चेतन चौधरी आणि साहिल गोयल यांची ओळख झाली होती. ही बाब साहिलने स्वतः मान्य केली आहे. त्यानंतर सिया एका सामन्यादरम्यान चेतनच्या संपर्कात आली आणि दोघांची मैत्री हळूहळू प्रेमसंबंधात बदलली.
 

 sahil agrawal  
 
 
याच पार्श्वभूमीवर सिया आणि चेतन यांच्या नात्याबाबत साहिलला आधीपासून माहिती होती का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सिया आणि चेतन यांच्या आयुष्यात केतन अग्रवालची एन्ट्री झाली आणि फेब्रुवारी महिन्यात सिया-केतनचा साखरपुडा झाला. मात्र, सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, अशी माहिती तिने साहिलला दिली होती, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतनचा गायब झालेला पासपोर्ट. बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी रवाना होताना केतन मुंबई विमानतळावर पोहोचला, मात्र त्याला पासपोर्ट सापडला नाही. त्यामुळे हा पासपोर्ट नेमका कुठे गेला, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे. जर सियाला हे लग्न नको होते, तर पासपोर्ट गायब होण्यामागे तिचा हात असू शकतो का, आणि ही शक्यता साहिलच्या लक्षात आली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
 
तपासादरम्यान पुण्यातील या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी सियाने वारंवार हट्ट धरला होता, असा गंभीर आरोप केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबीयांनी परवानगी नाकारूनही अवघ्या 12 दिवसांत तब्बल 4 वेळा सियाने लोहगडला जाण्याचा आग्रह धरला होता.कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, केतनला ट्रेकिंग आणि पर्वतरांगांमध्ये फिरण्याची आवड होती आणि त्याचाच फायदा घेत सियाने हा प्लॅन आखला. 30 मे रोजी पहिल्यांदा परवानगी मिळाली होती. त्यानंतर 4 जून रोजी परवानगी नाकारल्यानंतर सियाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा आरोप आहे. अखेर 18 जून रोजी वाढदिवसाचे कारण सांगून केतनला लोहगडावर नेण्यात आले आणि तिथेच त्याला किल्ल्यावरून ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणातील प्रत्येक नवीन खुलाशासोबत संशय अधिक गडद होत असून, आता तपास यंत्रणांचे लक्ष साहिल गोयलकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.