मुंबई,
shreyas talpade अभिनेता श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग नुकताच उलगडला आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे पहिले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, त्या कठीण टप्प्यावर फराह खान आणि शाहरुख खान यांनी दिलेल्या मदतीमुळे त्यांचे स्वप्न अखेर साकार झाले. श्रेयस यांनी सांगितले की, २००७ मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत होते. मात्र, गृहकर्जासाठी अनेक बँकांकडे अर्ज करूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. कर्ज मंजुरी लांबल्यामुळे ते चिंतेत आले होते.

याच दरम्यान एका बँकेतील अधिकाऱ्यांनी श्रेयस यांना ते सध्या कोणत्या चित्रपटात काम करत आहेत, अशी विचारणा केली. त्यांनी ‘ओम शांती ओम’चे नाव सांगताच अधिकाऱ्यांनी चित्रपटाशी संबंधित वरिष्ठांकडून शिफारसपत्र आणण्याचा सल्ला दिला. त्यानंतर श्रेयस यांनी तातडीने फराह खान यांच्याशी संपर्क साधला.फराह खान यांनीही कोणतीही दिरंगाई न करता श्रेयस यांना मदतीचा हात दिला. काही दिवसांतच शाहरुख खान यांच्या स्वाक्षरीसह आवश्यक शिफारसपत्र तयार करून देण्यात आले. हे पत्र बँकेत सादर होताच कर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली आणि श्रेयस यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. हा प्रसंग आठवताना श्रेयस तळपदे यांनी फराह खान आणि शाहरुख खान यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे आयुष्यातील एक मोठे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले.