राजोली उपवनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू

* वनविभागाकडून घटनास्थळी चौकशी व पंचनामा

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
मूल, 
striped-tiger-dies-in-rajoli : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या राजोली उपवनपरिक्षेत्रात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 30 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मुल तालुक्यातील चिखली गावावरुन कन्हाळगाव देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या ‘ओव्हरफ्लो’जवळ वाघ मृत आढळून आला.
 
 
j
 
 
 
वादळी वार्‍यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तलाव परिसरातील महावितरणच्या वीज वाहिनीचे खांब तुटून पडले होते. शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तेथे जाऊन वीज प्रवाह खंडित केला होता. वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी मूल येथील महावितरणच्या पथकातील कर्मचारी आज तेथे गेले असता, त्यांना हा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. माहिती मिळताच वनाधिकार्‍यांची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
 
 
सावली वनपरिक्षेत्राचे अधिकारी विनोद धुर्वे व वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे. मृत वाघाचे वैद्यकीय परीक्षण करून मृत्यूचे कारण शोधण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. घटनास्थळाला चंद्रपूर येथील उपवनसंरक्षक तरसे यांनी भेट दिली. घटनेची पुढील चौकशी धुर्वे, उपवनपरिक्षेत्र राजोली अंतर्गत चितेगाव बीटाचे वनरक्षक सतीश नागोसे, चव्हाण व चमू करीत आहेत.
 
 
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी याच मार्गाने एका महिलेची ये-जा झाली होती. त्यावेळी तिला वाघाचा मृतदेह दिसला नव्हता. त्यामुळे वाघाचा मृत्यू सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाघाच्या शरीरावरील सर्व अवयव शाबूत असल्याने अवयवांसाठी शिकार झाल्याची शक्यता कमी असली तरी विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.