गोंदिया,
students-enter-school-in-bullock : यंदाच्या शैक्षणिक सत्राला आज, 30 जूनपासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळांतील शालेय प्रशासनासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकार्यांच्या शाळेला भेटी देवून नवागतांचे जल्लोशात स्वागत केले. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके आदी शैक्षणिक साहित्याचे वितरणासह बैलगाडी, रथ, ट्रॅक्टरमधून शाळाप्रवेश करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. बैलगाडी, रथ, ट्रॅक्टरसह प्रभातफेरी काढून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी आदींनी शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या उपस्थितीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा इंजोरी, जि. प. प्राथमीक शाळा व हायस्कूल बोंडगाव देवी, वरिष्ठ प्राथमीक शाळा मोरगाव, अरततोंडी, पिंपळगाव, खांबी येथील शाळांमधील नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी गावातून भव्य शैक्षणिक रॅली काढण्यात आली. रॅलीला पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसंगी जि. प. अध्यक्ष भेंडारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाठ्यपुस्तके तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी भेंडारकर यांनी, शिक्षण हेच जीवनातील यशाचे सर्वात प्रभावी साधन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत. शिक्षणासोबतच खेळ, कला, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांचाही अंगीकार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक आणि समाज या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. दरम्यान, गोरेगाव तुलक्यातील तुमसर व सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी येथे बैलगाडी व भजन दिंडीच्या माध्यमातून प्रभातफेरी काढून नवागतांचे स्वागत करण्यात आले.