जांब नदीवरील पर्यायी रस्ता पुरात वाहून गेला

दिवसभर वाहतूक ठप्प; नागरिकांचा मनस्ताप

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
२५ किमीचा फेरा मारून प्रवास
 
 
तळेगाव (श्या.पं.),
jamb river आष्टी ते कारंजा (घा.) मार्गावरील बोरखेडी गावाजवळ जांब नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. बांधकाम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नदीपात्रातून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता; मात्र योग्य नियोजनाअभावी हा रस्ता पहिल्याच मोठ्या पुरात वाहून गेल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाश्यांना २५ किमीचा फेरा मारून नियोजित ठिकाणी प्रवास करावा लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
jamb river
 
सोमवार २९ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जांब नदीला पूर आला. नदीच्या पहिल्याच पुरामध्ये वाहून आलेला कचरा, मोठी झाडे व इतर अडथळे बांधकामासाठी करण्यात आलेल्या तात्पुरत्या मार्गाजवळ अडकले. परिणामी, पाण्याचा प्रवाह अडून पुराचा तडाखा बसला आणि पर्यायी रस्ता अक्षरशः वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने बस, खाजगी वाहने आणि दैनंदिन वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली. नागरिकांना पर्यायी मार्गाने तब्बल २५ किमीचा फेरा मारून प्रवास करावा लागला. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांच्या झोपड्यांमध्येही पुराचे पाणी शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे मजुरांची धावपळ उडाली. बोरखेडी येथील नागरिकांच्या मदतीने मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली.
 
 
कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कामामुळे नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत असून, पर्यायी रस्ता तयार करताना आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जांब नदीवरील कामामुळे आधीच त्रस्त नागरिकांचा संयम संपत चालला असून, वाहून गेलेला मार्ग तात्काळ दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्याची तयारी नागरिकांकडून व्यत होत आहे.