५० किलो गांजासह ट्रकचालक अटकेत

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
- पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई; २७.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अनिल कांबळे
नागपूर, 
Truck driver arrested with cannabis नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत ५० किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गांजासह ट्रक आणि मोबाईल असा एकूण २७ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अलाउद्दीन मोहम्मद जमालुद्दीन शराफत अली मलिक असे आहे. तर या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी हा ओडिशा राज्यातील संबलपूर येथील रहिवासी असून तो फरार आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त रुजू होताच शहरात कारवाईचा धडाका सुरु झाला आहे.
 
ganja
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस पथकाचे पोलिस निरीक्षक सारंग मिराशी यांच्या नेतृत्वाखालील पथक मंगळवारी दुपारी पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंडारा–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वन उपज नाक्यासमोर, उमिया कॉम्प्लेक्सजवळ गस्त घालत होते. त्यावेळी सहा चाकी ट्रकच्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने वाहन थांबवून एनडीपीएस कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करत दोन पंचांसमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकच्या केबिनमधून ५० किलो ५६० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गांजा, ट्रक आणि मोबाईल फोन असा एकूण २७ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पारडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे एनडीपीएस पथक करीत आहे.