पेट्रोल दर कमी करा, नाहीतर...

ट्रम्प यांचा विक्रेत्यांना थेट इशारा

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Trump's direct warning to sellers अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील पेट्रोल विक्रेत्यांना थेट इशारा देत इंधन दर तात्काळ कमी करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असूनही ग्राहकांना त्याचा लाभ मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, पेट्रोल विक्रेत्यांनी तात्काळ आपले दर कमी करावेत. तेलाचा भाव आता प्रति बॅरल ६८ डॉलर असून तो आणखी घसरत आहे, त्यामुळे दर खूप जास्त आहेत. विक्रेत्यांनी यावर तात्काळ लक्ष देऊन जे योग्य आहे ते केले पाहिजे: आपल्या महान अमेरिकन जनतेसाठी दर कमी करावेत.
 
Trump
 
 
त्यांनी पुढे इशारा देताना म्हटले की, किमती मनमानीपणे वाढवणे हे बेकायदेशीर ठरू शकते आणि जर विक्रेत्यांनी दर कमी केले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांनी इंधन दर प्रति गॅलन सुमारे २.५० डॉलरपर्यंत खाली आणण्याचे आवाहनही केले.कॅलिफोर्नियावर टीका करताना ट्रम्प यांनी तेथील इंधन करांवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जास्त करांमुळे पेट्रोलचे दर अनावश्यकपणे वाढले असून नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्येही अमेरिकेचे लक्ष केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे दोहा येथे इराणी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. अलीकडील संघर्षानंतर दोन्ही बाजूंमध्ये शस्त्रसंधीबाबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लिव्हिट यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे. त्यांनी स्पष्ट केले की सध्या शस्त्रसंधीचे पालन सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेच्या ऊर्जा धोरणासोबतच मध्यपूर्वेतील राजकीय परिस्थितीवरही पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.