सेलू,
vadgaon-road-waterlogged : सेलू शहरातील वडगाव रोड, प्रभाग १३ परिसरात पहिल्याच जोरदार पावसाने नगरपंचायतच्या पावसाळी पूर्वतयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले असून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील नाल्यांची साफसफाई वेळेत न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्ते व घरांमध्ये घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडे जलनिस्सारणाची व्यवस्था सुधारण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याची नाराजी व्यक्त केली. या नपं प्रशासनाने जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी करून नाले साफ करावे, साचलेले पाणी त्वरित हटवावे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाची हजेरी
शेतकर्यांच्या पेरण्या पूर्णत्वाकडे जात असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळ, विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शेतातून शेतकरी घरी येण्याची वेळ असताना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आकाशात ढग जमू लागले. वारा सुटला वार्याचे वादळात रुपांतर झाले अन् मेघ गर्जनेसह पाऊस आला. हा शेतकर्यांना सुखावणारा ठरला तर वातावरणातील उकाडा कमी करण्यास कारणीभूत ठरला. मृग नक्षत्राने पाठ फिरवल्यानंतर आर्द्रा नक्षत्राने शेतकर्यांना साथ दिली. सेलू परिसरात सायंकाळी ६.३० चे सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली हा पाऊस ७.४० पर्यंत धो धो बरसला. त्यानंतर रिमझिम पाऊस सुरूच होता. शेत शिवारातील नाले ओसंडून वाहीले. सेलू परिसरात गत दोन ते तीन दिवसात अनेक शेतकर्यांनी पेरणी केली त्या नंतर कुठे कुठे पाऊस पडला. पण सोमवारी रात्री आलेल्या दमदार पावसामुळे लावलेले बियाणे निघणार की दबणार अशी चर्चा शेतकरी करीत होते. पावसाने कही खुशी कही गम अशी अवस्था झाल्याचे चित्र होते. घोराड गावासह काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.