वर्धा,
wardha news ताल, लय आणि नाद यांची त्रिसूत्री संगीत-कलाविष्काराचे मूलाधार आहे. नाद म्हणजे स्वरांचा आणि कंपनांचा मूळ स्रोत असून तो सर्जनशीलतेचा आरंभ असतो. लय म्हणजे त्या नादाचा कालबद्ध प्रवाह आणि ताल म्हणजे त्या लयीला धरून ठेवणारा रचना-ढाचा आहे. संगीत किंवा नृत्य या कलारूपांमध्ये नाद शुद्ध स्वर-गुणवत्तेने व्यत होतो. त्यावरून लय उत्पन्न होते आणि ती लय विशिष्ट मात्रांच्या आणि आवर्तनांच्या स्वरूपात तालात गुंफली जाते. त्यामुळे प्रत्येक नादकृतीत नाद, लय आणि ताल यांमध्ये सुसंवाद असणे अनिवार्य असते. कलाकार तिन्ही घटकांच्या संतुलनावरच यशस्वी ठरतो, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.

ते नाट्यप्रतीक थिएटर अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘मस्तीची पाठशाला’ या नाट्य कार्यशाळेचा समारोप प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ, मिलन गांधी, सुनील तितरे, प्रज्वल लटारे, चेतन शिंदे, शार्दूल वांदिले, वैभव तिजारे, मोहन सायकर, आशिष मोहोड, अभिजित रघुवंशी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मेंदूचा शॉर्ट सर्किट आणि आदिंबाच्या बेटावर चिमुकल्या कलाकारांनी या दोन्ही नाटकांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
मुख्य आयोजक प्रतीक सूर्यवंशी यांनी मुलांमधील सुप्त कलाकार जागा करणे हे आमचे ध्येय आहे. या कार्यशाळेतून मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. विकास फेटिंगे यांनी अभिनय म्हणजे केवळ संवाद फेकणे नव्हे तर तो जीवनाचा अनुभव आहे. आजच्या या सादरीकरणातून मुलांची प्रगती दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी आणि प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.