अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेवर हल्ला

- महिलेच्या मुलीलाही केली मारहाण

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
woman-attacked : सक्करदरा परिसरात झुंबा डान्स क्लास चालविणाऱ्या ३५ वर्षीय प्रशिक्षक महिलेसोबत शेजारी राहणाऱ्या युवकाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. त्याच संशयातून पत्नी व तिच्या नातेवाईकांनी शेजारी राहणाऱ्या प्रशिक्षक महिलेवर हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी तिच्या मुलीने मध्यस्थी केली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 

NGP 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो, तर महिला झुंबा क्लास चालवते. आरोपी गजाननच्या पत्नीला झुंबा डान्स प्रशिक्षक महिलेसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्या दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, त्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नीला होता. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. २७ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास आरोपी गजानन आणि त्याची पत्नी यांनी पीडित महिलेच्या घरासमोर शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली.
 
 
वाद विकोपाला गेल्यानंतर गजाननने हातातील लोखंडी रॉडने महिलेच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. आईच्या मदतीला धावलेल्या २० वर्षीय मुलीलाही आरोपीने मारहाण केली. तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने घराच्या काचा फोडून नुकसान केले. जाताना संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तो घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी गजानन व त्याच्या पत्नी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.