खुर्दा,
youth dies following suspicion of theft ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील बनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चोरीच्या संशयावरून एका ३२ वर्षीय तरुणाला गावातील विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आणि काही दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत तरुणाची ओळख भीमपूर गावातील बाघुआपदार साही येथील रहिवासी तोफान नायक अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो २८ जून रोजी दुपारी सुमारे चार वाजता काही वैयक्तिक कामासाठी खानत गावात गेला होता. त्याच वेळी काही गावकऱ्यांना त्याच्यावर चोरीचा संशय आल्याने त्याला पकडण्यात आले आणि गावाच्या मध्यभागी असलेल्या विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली.
या घटनेची माहिती ११२ आपत्कालीन सेवेला देण्यात आल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाची सुटका करून त्याला बनपूर पोलीस ठाण्यात नेले. नंतर कुटुंबीयांनी जामीनपत्र देऊन त्याला ताब्यात घेतले. मात्र घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांनी त्याला प्रथम बनपूर रुग्णालयात दाखल केले, तेथून त्याला गंभीर अवस्थेत भुवनेश्वरला हलवण्यात आले, मात्र कॅपिटल रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताची पत्नी सस्मिता नायक यांनी बनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत खानत गावातील ५१ वर्षीय पवित्रा राऊत आणि ६० वर्षीय शरत कुमार स्वाइन या दोन जणांना अटक केली आहे. दरम्यान, खुर्दा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्मिथ परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला स्थानिक तक्रारींवरून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच कुटुंबीयांनी लेखी स्वरूपात तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे नमूद केल्यामुळे त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले होते, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक २५४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २९६, १०३(१), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.