भंडाऱ्यात अन्न-औषध भेसळीवर मोठी कारवाई

लाखोंचा प्रतिबंधित साठा जप्त

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
भंडारा,
Action Against Adulteration in Bhandara भंडारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांत मोठी कारवाई करत भेसळयुक्त, कमी दर्जाचे आणि आरोग्यास हानिकारक अन्नपदार्थ व औषधांवर धडक मोहीम राबवली आहे. राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सुमारे २ लाख ३७ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील काही आयुर्वेदिक व औषध दुकानांमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करून आजार बरे करण्याचे खोटे दावे केल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापे टाकून सुमारे २९ हजार रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला.
 
 
nhandara
 
या कारवाईत श्री लक्ष्मी आयुर्वेद औषधालय आणि एका पतंजली संबंधित चिकित्सालयातून विविध औषधी व उत्पादने जप्त करण्यात आली. तसेच बाजारात विक्रीस असलेली काही उत्पादने दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे संशयाच्या भोवऱ्यात आली होती.भंडारा शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून ३४ हजार रुपयांची संशयित सुपारी जप्त करण्यात आली, तर मोहाडी तालुक्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. लाखांदूर येथे मिळालेल्या तक्रारीनंतर १ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा संशयित खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे.
 
 
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबा विक्रेत्यांचीही तपासणी करण्यात आली असून स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय तुमसर शहरात गुटखा व पान मसाल्याचा अवैध साठा आणि संबंधित मशीन जप्त करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिक कठोर करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.