* टाकळी निधा तहानलेलेच
आजनसरा,
Ajansara Gram Panchayat: Water Problem गावात मुबलक पाणी, त्या पाण्यासाठी लाखो खर्च करून जलवाहिनीही टाकल्या गेली. परंतु, टाकीत नाही पाणी... पर्यायाने नळाला थेंब नाही अशी विदारक स्थिती टाकळी (निधा) गावाची झाली आहे. गेल्या १० वर्षांपासून गावकरी पाण्याच्या थेंबासाठी झगडत आहेत. शासन-प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे टाकळी गावाला कोरडेच अशी परिस्थिती आहे.
गावाला पाणी मिळावे म्हणून १० वर्षांपूर्वी गावात ग्रामपंचायत शेजारीच लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारली. गावात जलवाहिनी टाकली. यशोदा नदीकाठी विहीर खोदली. मुबलक पाणीही लागले. पण, शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे काम अर्धवटच राहिले. त्या टाकीत आजपर्यंत एक थेंबही पाणी पोहचलं नाही. परिणामी, कोरड्या टाकीला ठिकठिकाणी भेगा पडून ती पूर्णपणे निकामी झाली. गावकर्यांच्या रोषानंतर ३ वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ८० लाख रुपये खर्च करून नवीन टाकीचे बांधकाम आणि जलवाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली. पण, त्या आशेवरही पाणी फेरल्या गेले. त्या नव्या टाकीतही आजतागायत पाण्याचा एक थेंबही पोहोचला नाही. ती टाकीही ३ वर्षांपासून कोरडी राहिल्याने या टाकीलाही आता भेगा पडू लागल्या आहेत. ८० लाखांचा निधीला पुन्हा तडे जाऊ लागले आहेत. गावात २-२ टाया, विहिरीला मुबलक पाणी, जलवाहिनीही तयार सर्वकाही असूनही गाव तहानलेलंच आहे. ४ वर्षांपासून गावात प्रशासक राज आहे. पाणी नसल्याने गावातील महिला रणरणत्या उन्हात हातात हंडे घेऊन मैलोनमैल पायपीट करीत आहेत.
Ajansara Gram Panchayat: Water Problem या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालावे. संबंधित ग्रामसेवक आणि प्रशासकांवर तात्काळ कारवाई करून टाकळी (निधा) गावाचा पाणी प्रश्न युद्धपातळीवर सोडवावा, अशी मागणी माजी सरपंच आशिष राऊत, डॉ. संदीप लोंढे, जनार्धन जवंजाळ, कमलाकर वनकर, बंडू शंभरकर, राजू दुकानदार, मिलिंद वानखेडे, रोशन धनाडे, विश्वरवी गोटे यांनी केली आहे.