जोधपूर
Anita Bishnoi सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रिलस्टार अनिता बिश्नोई हिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे समोर आली आहे. बनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारगड परिसरातील गोदारो ढाणी येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली. सध्या तिच्यावर मथुरादास माथुर (एमडीएम) रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अनिता बिश्नोई या सोशल मीडिया रिल्सच्या माध्यमातून परिचित झाल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्याने ट्रोलिंग, अश्लील कमेंट्स आणि धमकीच्या संदेशांचा सामना करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मानसिक त्रासातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.घटनेच्या सुमारे पाच तास आधी अनिताने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. “आजपासून तुमची बहिण या जगात दिसणार नाही,” असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते. ही पोस्ट समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तासांतच तिने विष प्राशन केल्याचे सांगण्यात आले.
अनिताच्या पती दीनाराम Anita Bishnoi यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून काही सोशल मीडिया युजर्स आणि कथित इन्फ्लुएन्सर्सकडून अनिताला लक्ष्य केले जात होते. तिच्याविरोधात अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्स तसेच व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश पाठवले जात होते. या सततच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, अनिताने अलीकडेच महिलांच्या कपड्यांबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आणि त्यातूनच ट्रोलिंग अधिक तीव्र झाल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी तिने आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण देत, तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे आणि आपल्याला विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते.तरीही ट्रोलिंग थांबले नसल्याने तिच्यावर मानसिक ताण वाढत गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून सोशल मीडिया अकाउंट्स, धमकीचे संदेश आणि संबंधित ऑनलाइन हालचालींची चौकशी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
सध्या अनिता बिश्नोईवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग, मानसिक आरोग्य आणि ऑनलाइन छळ यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.