चंदीगड
Chandigarh Sago बॉलिवूड रॅपर आणि गायक बादशाह पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून चंदीगड प्रशासनाने त्याच्या मालकीच्या ‘सागो’ डिस्को क्लबवर मोठी कारवाई करत क्लब सील केला आहे. सेक्टर २६ परिसरातील या हाय-प्रोफाइल क्लबमध्ये अनधिकृत बांधकाम आणि नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांनंतर प्रशासनाने ही धडक कारवाई केली आहे.
चंदीगड प्रशासनाच्या अंमलबजावणी विंगने काही दिवसांपूर्वीच क्लब व्यवस्थापनाला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मंगळवारी पोलिस बंदोबस्तात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन क्लबला कुलूप ठोकले. या कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.प्रशासनाच्या तपासात क्लबच्या बांधकामात मंजूर नकाशापेक्षा मोठे बदल करण्यात आल्याचे आणि इमारतीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ ‘सागो’ क्लबच नव्हे तर सेक्टर ७ आणि २६ परिसरातील इतर काही हाय-प्रोफाइल क्लब्सनाही अशाच प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहितीही समोर आली आहे.‘सागो’ क्लबची सुरुवात २०२३ मध्ये झाली होती आणि तो बादशाहच्या रेस्टॉरंट्स व बार साखळीचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. मात्र सुरूवातीपासूनच हा क्लब वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. २०२४ मध्ये या क्लबच्या बाहेर झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्या हल्ल्याची जबाबदारी परदेशात असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित टोळीने घेतल्याचेही त्या वेळी समोर आले होते.
या ताज्या कारवाईमुळे Chandigarh Sago बादशाहच्या व्यावसायिक अडचणी वाढल्या असून त्याच्या क्लब व्यवसायावर प्रशासकीय दबाव आणखी वाढल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अलीकडेच त्याचे एक गाणे ‘तातिरी’ वादाच्या केंद्रस्थानी आले होते. या गाण्यातील काही दृश्यांवरून आणि मजकुरावरून मोठा वाद निर्माण झाला होता. वाढत्या टीकेनंतर संबंधित व्हिडिओ हटवून सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली होती.सध्या या संपूर्ण प्रकरणावर बादशाहकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून, या कारवाईमुळे चंदीगडमधील नाईटलाईफ आणि क्लबिंग उद्योगातही चर्चा सुरू झाली आहे.