४.५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वाशीम,
Burglary Case जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालुयातील येडशी येथे घरफोडी करून ४ लाख ५४ हजार रुपयाचे दागिने लंपास करणार्या चोरट्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. पुणे येथे फरार झालेल्या आरोपीला शिताफीने अटक करून पोलिसांनी चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
११ मे २०२६ च्या रात्री येडशी येथील अश्विनी प्रवीण तायडे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी १२ मे रोजी मंगरुळनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथकासह तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, येडशी येथीलच रहिवासी संघदीप चंदू वानखडे हा या गुन्ह्यातील मुख्य संशयित असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा गुन्हा करून पुण्यात पसार झाला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने पुण्यात रवाना झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
Burglary Case पोलिसी खाया दाखवताच आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याने हे दागिने शेलू बाजार येथील दोन सोनारांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेलू बाजार येथे धाव घेऊन पंचासमक्ष ५२ ग्रॅम सोने व ४२ ग्रॅम चांदी असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर कारवाई वाशीमचे पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, मंगरुळनाथचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके, पोउपनि निलेश जाधव, पोहवा महेश वानखडे, गोपाल चौधरी आणि शाम इंगळे यांचा समावेश असलेल्या पथकाने केली.