जगाला नवा मार्ग फक्त भारतच देऊ शकतो

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप

नागपूर, 
जगाला एका नव्या मार्गाची गरज आहे, तो फक्त भारतच देऊ शकेल, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले. यासाठी भारताची वेळ आली आहे. पण, वेळ आपोआप येत नाही, त्यासाठी तयार राहावे लागेल, याकडेही त्यांनी त्यांच्या उद््बोधनातून लक्ष वेधले.
 
 
Dr. Mohanji Bhagwat
 
रा.स्व. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप रेशीमबाग मैदानावर आज झाला. प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, वर्गाचे सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या उद््बोधनात डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, हिंदू जागृतीचा परिणाम समोर आला आहे. ज्या हिंदू समाजाच्या खांद्यावर भारताची जबाबदारी आहे, तो आपली जबाबदारी उचलण्याच्या इच्छेने सतर्क होत आहे, जागृत होत आहे व त्याचे परिणाम अनेक दिशांनी स्पष्ट होत आहेत. भारताला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांकडे अनुकूल परिस्थिती आहे.
 
 
इराण-अमेरिका युद्ध व एकंदरितच परिस्थितीचा उल्लेख करून डॉ. मोहनजी पुढे म्हणाले की, या जगाला भारताची गरज आहे, कारण या सर्वांना जोडणारा घटक दुसऱ्या जगाकडे नाही. गरजा योग्यप्रकारे पूर्ण व्हायला हव्यात, हे एकत्र कसे घडू शकते, हे जगाला माहीत नाही. माहिती पुस्तकांमध्ये आहे. जग ते वाचते. प्रत्यक्षात आणायचे असते, तेव्हा सवयीचा प्रश्न निर्माण होतो. एके काळी भारत विश्वगुरू होता. केवळ आध्यात्मिक गुरूच नाही, तर आर्थिक दृष्ट्याही भारत जगातला पहिला देश होता. आम्ही ज्ञान आणि विज्ञानातही सर्वोच्च होतो. येथूनच संस्कृती, सभ्यता आली. अध्यात्मासोबतच शिक्षण, भौतिकशास्त्र, सर्व ज्ञान, आयुर्वेद, गणित, हे सर्व येथूनच आले आहे.
 
 
पण आम्ही हजार वर्षे गुलामगिरीत होतो. ज्यांनी आम्हाला गुलाम बनवले तेही आमच्यापेक्षा शेष्ठ नव्हते. त्यांची संख्या फार नव्हती. ते दूरवरून आले व त्यांनी आमच्यावर विजय मिळवला. आम्ही स्वतःचे रक्षण केले नाही. आम्ही विसरलो, आम्ही आमची तयारी गमावली.
 
 
हिंदू समाजाने आपल्या भाषा, रंग, पंथ, जाती व श्रद्धा यांची सर्व विविधता जपून एका धाग्यात एकत्र यावे. त्यांनी एक व्हावे व त्यांच्या जीवनात अशी भावना असावी की हा देश माझा आहे, हा समाज माझा आहे, हा धर्म, ही संस्कृती माझी आहे. दोन-तीन दशकात भारत विश्वगुरू होईलही. भारताला अशा प्रकारे उभे राहायचे आहे की, संपूर्ण जगाने त्याकडे पाहून म्हणावे की, ज्या पायावर त्यांनी आपला देश उभारला आहे, त्याच पायावर आम्ही आमच्या निसर्गाच्या आधारावर आमचा देश उभारला आहे. नव्या जगाच्या उभारणीचा पाया बंधुभावाचा, एका कुटुंबाचा व सर्वांमध्ये एकत्व पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आहे, हे Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी अधोरेखित केले.