- डॉ. संदीप शिरखेडकर आणि टीम इमेजिसच्या संशोधनातील निष्कर्ष
- नागपूरसह हिंगणा तालुक्यात संशोधन
अनिल फेकरीकर
नागपूर,
Dr. Sandeep Shirkhedkar सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणल्यानेच तापमानात वाढ झाली आहे, अशाच स्वरूपाचा कांगावा काही लोकांनी सुरू केला आहे. पण तो कांगावा पूर्णत: खोटा असून, सिमेंटचे नव्हे तर डांबराचे रस्तेच दिवसा सरासरी 0.41 डिग्री सेल्सिअसने अधिक तापतात असाच निष्कर्ष डॉ. संदीप शिरखेडकर आणि टीम इमेजिसने केलेल्या संशोधनातून पुढे आला आहे.
नागपुरातील शिवाजीनगर, रामनगर, धरमपेठ, शंकर नगर, गांधी नगर तर ग्रामीण क्षेत्रात हिंगणा, किन्ही, मांगली, नांदा, रायपूर या भागात डॉ. संदीप शिरखेडकर आणि टीम इमेजिसने संशोधन केले. उन्हाळ्यात सिमेंटचे रस्ते किंवा डांबराचे रस्ते किती तापतात यावर हे संशोधन आधारित होते. त्यानुसार 18 ते 27 मे 2026 या कडक उन्हाळ्याच्या काळात रणरणत्या उन्हात हे संशोधन करण्यात आले. याकरिता डिजिटल थर्मामीटर, जीआयएस सॉफ्टवेअरसह सर्वच अत्याधुनिक संयंत्राचा वापर करून रस्त्यांच्या पृष्ठभागापासून वेगवेगळ्या उंचीवर, झाडांच्या सावलीत आणि शेतात हजारो नोंदी घेण्यात आल्या. डांबरी आणि काँक्रीट रस्त्यांच्या तापमानातील सूक्ष्म फरकांचा अभ्यास करून भविष्यातील शहरी नियोजनासाठी आणि उष्णता कमी करण्याच्या उपायांसाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे हा या अभ्यासाचा हेतू होता, असेही इन्स्टिट्यूटशन ऑफ इंजिनीअर्सचे अध्यक्ष डॉ. संदीप शिरखेडकर यांनी स्पष्ट केले.
संशोधनात शहरी भागात डांबरी रस्त्यापेक्षा काँक्रीट रस्ता सरासरी 0.41 डिग्री सेल्सिअसने थंड आढळला. रात्रीच्या वेळी हा फरक सरासरी 0.46 डिग्री सेल्सिअस होता. यामुळे उन्हाळ्याच्या रात्री काँक्रीट रस्ते डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अधिक आराम देतात. रस्त्यांच्या आजूबाजूला असलेल्या उद्यानांचे तापमान रस्त्यांच्या तुलनेत सरासरी 1.78 ते 1.9 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी आढळले.
Dr. Sandeep Shirkhedkar ग्रामीण भागात दिवसा आणि रात्री दोन्ही प्रकारच्या रस्त्यांचे तापमान जवळपास सारखेच होते. मातीतील ओलाव्याचे महत्त्वही यावेळी समोर आले. त्यानुसार शेतातील तापमान रस्त्यांच्या कडेपेक्षा सरासरी 1.3 ते 1.4 डिग्री सेल्सिअसने कमी आढळले. सामान्यत: रस्त्याचा पृष्ठभाग काँक्रीटचा आहे किंवा डांबराचा याचा आजूबाजूच्या वातावरणातील हवेच्या तापमानावर अतिशय कमी किंवा मर्यादित प्रभाव पडत असल्याचेही अभ्यासात समोर आले. संपूर्ण उन्हाळ्याचा डाटा पाहता डांबर अर्थात बिटुमीनच्या तुलनेत काँक्रीटचा पृष्ठभाग उष्णता कमी प्रमाणात टिकवून ठेवतो. त्यामुळे दीर्घकालीन सुविधेसाठी डांबरी रस्त्यांपेक्षा काँक्रीट मार्गांची निर्मिती करणे अधिक फलदायी ठरेल, असाही निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.
थंडावा हवा तर झाडे लावा
डांबरांपेक्षा सिमेंटचे रस्ते उन्हाळ्यात जास्त तापतात अशीच भूमिका सामान्यांसह सर्वच मंडळी मांडत होती. पण खरोखरच ते किती तापतात, हाच संशोधनाचा मूळ हेतू होता. त्यानुसार सारंग परांजपे, रोहित माने, सुफिया पठाण, नितीन देशमुख, आर्यन बटुलवार, प्रवीण चौरेवार, अजय नान्हे, उज्ज्वला ढोकणे, देवांगी घाडगे यांनी हे संशोधन यशस्वी व्हावे याकरिता रात्रंदिवस मेहनत घेतली, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. संदीप शिरखेडकर यांनी दिली. दरम्यान, थंडावा हवा तर झाडे लावा अन् त्यांना टिकवा असाही संदेश त्यांनी दिला.
क्षेत्र आणि वेळ काँक्रीट रस्ता डांबरी रस्ता शेत किंवा परिसर
शहरी भाग दिवस 43.63 डिग्री सेल्सिअस, 44.04 डिग्री सेल्सिअस 43.15 डिग्री सेल्सिअस
शहरी भाग रात्री - 33.81 34.27 33.92
ग्रामीण भाग दिवस 45.28 45.44 45.43 खुले शेत
ग्रामीण भाग रात्री 35.08 35.09 33.78 शेतजमीन