मुझफ्फरपूर,
Fire breaks out at hospital in Muzaffarpur बिहारमधील मुझफ्फरपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्रह्मपुरा परिसरातील प्रसाद रुग्णालयात ही घटना घडली असून, आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. विशेषतः आयसीयू विभागात धूर मोठ्या प्रमाणात पसरल्याने रुग्णांना गंभीर फटका बसला. पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेक अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि दीर्घ प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आयसीयूमध्ये दाखल असलेल्या काही रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

प्राथमिक तपासात आयसीयू विभागात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचे लोट संपूर्ण विभागात पसरल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाबाहेर धाव घेतली, तर गंभीर रुग्णांना कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला तसेच जखमी रुग्णांच्या उपचारांची व्यवस्था सुनिश्चित केली. काही रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.