आणखी एका आरोपीस अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
उमरखेड,
Gajanan Suroshe Murder Case तालुक्यातील सुकळी येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन सुरोशे यांची दगडाने ठेचून गो-तस्करांनी हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अगोदर सात आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील एक आरोपी हैद्राबाद येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली त्यावरून त्यास साफळा रचून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Gajanan Suroshe Murder Case आरोपी शेख अरबाज शेख अहेमद हुसेन (वय 24, राजेंद्र वॉर्ड, उमरखेड) हा गुन्हा घडल्यापासून पळून जाऊन हैद्राबाद येथे लपून राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला प्राप्त झाली. माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या नेतृत्वात मुन्ना आडे, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे यांचे पथक हैद्राबाद येथे रवाना झाले. या पथकाने दोन दिवस तेथे राहून गुरुवार, 4 जून रोजी पहाटे 3 वाजता शिताफीने सापळा रचून आरोपीला झोपेत असताना अटक केली. त्यास हैद्राबाद येथून ताब्यात घेत उमरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड व स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.