'झेड प्लस'ची अभेद्य सुरक्षा, तरीही माळढोकचे पिल्लू बेपत्ता!

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
अहमदाबाद,
Great Indian Bustard news भारतातील सर्वात दुर्मिळ आणि अत्यंत संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक असलेल्या माळढोक पक्षी संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधून गुजरातमध्ये विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने आणलेल्या अंड्यातून जन्मलेले माळढोक पक्षाचे पिल्लू आणि त्याची आई अचानक बेपत्ता झाल्याने वन्यजीव तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे या पिल्लाच्या सुरक्षेसाठी तब्बल ५० सुरक्षारक्षक, निरीक्षण मनोरे आणि २४ तास देखरेखीची व्यवस्था करण्यात आली होती.आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (IUCN) माळढोक पक्ष्याची नोंद ‘अत्यंत संकटग्रस्त’ प्रजातीमध्ये केली आहे. राजस्थानचा राज्यपक्षी असलेला हा पक्षी भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती वाळवंटी भागात आढळतो. ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ या नावाने ओळखला जाणारा माळढोक हा जगातील सर्वात जड उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक मानला जातो. राजस्थानमध्ये त्याला ‘सोन चिरैया’ या नावाने संबोधले जाते.गेल्या काही दशकांत अधिवास नष्ट होणे, शिकारी, वीजवाहिन्यांमुळे होणारे अपघात आणि हवामान बदल यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. २०११ मध्ये जगभरात सुमारे २५० माळढोक पक्षी अस्तित्वात असल्याचा अंदाज होता. मात्र २०१८ पर्यंत ही संख्या घटून अवघ्या १५० पर्यंत पोहोचली. त्यामुळे या पक्ष्याच्या अस्तित्वाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 

great indian bustard news 
 
 
शिकारी प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूचा अंदाज
माळढोक पक्षी संवर्धनासाठी केंद्र सरकारने ‘प्रोजेक्ट जीआयबी’ सुरू केला असून राजस्थानमधील संवर्धन केंद्रांमध्ये सध्या ७३ पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे. यामध्ये नव्याने जन्मलेल्या पाच पिल्लांचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे माळढोक पक्षाची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.गुजरातमधील कच्छ परिसरात फक्त तीन मादी माळढोक उरल्याने वैज्ञानिकांनी विशेष प्रयोग हाती घेतला होता. राजस्थानमधील सॅम संवर्धन केंद्रातून २१ मार्च २०२६ रोजी एक अंडे पोर्टेबल इनक्युबेटरमध्ये ठेवून सुमारे ७७० किलोमीटरचा आणि १९ तासांचा प्रवास करून नालिया येथे आणण्यात आले. त्यानंतर ‘जंपस्टार्ट’ तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अंडे एका मादी पक्षाच्या घरट्यात ठेवण्यात आले. २६ मार्च रोजी त्या अंड्यातून पिल्लाचा जन्म झाला आणि हा प्रयोग संवर्धन क्षेत्रातील मोठे यश मानला गेला. मात्र, १८ एप्रिलनंतर हे पिल्लू आणि त्याची आई अचानक दिसेनाशी झाली. वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कुत्रे, कोल्हे किंवा इतर शिकारी प्राण्यांच्या हल्ल्यात पिल्लाचा मृत्यू झाला असावा.
 
 
 
 
पाकिस्तानमध्येही माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रयत्न
मात्र अद्याप कोणतेही ठोस पुरावे किंवा अवशेष सापडले नसले तरी पिल्लू जिवंत असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, माळढोकच्या  पिल्लांचा मृत्यूदर नैसर्गिकरीत्या खूप जास्त असतो. लहान वयात शिकारी प्राण्यांचा धोका अधिक असल्याने त्यांचे अस्तित्व टिकवणे मोठे आव्हान ठरते. तरीही या घटनेनंतर संवर्धन प्रकल्पाचे महत्त्व कमी होत नाही. राज्यांदरम्यान अंडी हस्तांतरण करून प्रजनन प्रक्रिया यशस्वीपणे राबविता येते, हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्येही माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. चोलिस्तान वाळवंट परिसरात अभयारण्ये उभारणे, शिकारीवर बंदी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पक्ष्यांवर लक्ष ठेवणे अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. माळढोकचे अस्तित्व वाचवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी हवामान बदल, अधिवासाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप यांसारखी आव्हाने कायम आहेत. त्यामुळे या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनासाठी अधिक व्यापक आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.