*निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुपची मागणी
*नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्यांना निवेदन
हिंगणघाट,
'Heritage Tree' Status for Trees शहरातील पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वृक्षांना हेरिटेज ट्री (वारसा वृक्ष) म्हणून घोषित करून त्यांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुपच्या वतीने नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर आणि नप मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंगणघाट शहरात अनेक जुने, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष आजही अस्तित्वात आहेत. या वृक्षांना वारसा वृक्षांचा दर्जा देऊन त्यांचे संवर्धन व कायदेशीर संरक्षण करणे आवश्यक आहे. मागील चार वर्षांपासून शहरातील वृक्षांना हेरिटेज दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याउलट, चंद्रपूर महानगरपालिकेने शहरातील विशेष वृक्षांना हेरिटेज ट्रीचा दर्जा देऊन त्या वृक्षांजवळ माहिती फलकही उभारले आहेत. त्याच धर्तीवर हिंगणघाटमध्येही हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
'Heritage Tree' Status for Trees त्याचप्रमाणे हिंगणघाट वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करून नागरिकांकडून वारसा वृक्षांची माहिती मागविण्यात यावी. धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व असलेल्या वृक्षांची नोंद करून त्यांना हेरिटेज दर्जा प्रदान करण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सकारात्मक विचार करून हिंगणघाटमधील विशेष वृक्षांना वारसा वृक्षांचा दर्जा देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांनी दिले. निवेदन देतेवेळी प्रवीण कडू, रुपेश लाजूरकर, सतीश नक्षिणे, अमित जोगे, गणेश पोलकडे आदी उपस्थित होते.