कुवेत,
Indian killed in Kuwait drone attack कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या कथित ड्रोन हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखी तीव्र झाला आहे. या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ६३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक आरोग्य विभागाने सांगितले आहे. भारतीय नागरिकाच्या मृत्यूबद्दल कुवेतमधील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला असून जखमींना आवश्यक मदत पुरवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना विविध रुग्णालयांत हलविण्यात आले. विमानतळाच्या टर्मिनल-१ परिसराचे मोठे नुकसान झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ विमान वाहतूकही स्थगित करण्यात आली.दरम्यान, अमेरिकन लष्कराच्या मध्यवर्ती कमांडने यापूर्वी कुवेतमधील अमेरिकी तळांवर ड्रोनद्वारे हल्ल्याचे प्रयत्न झाल्याची माहिती दिली होती. बहुतेक हल्ले निष्फळ ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण प्रदेशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील संभाषणही चर्चेत आले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, दोन्ही देशांतील धोरणात्मक संबंध कायम असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.इराणने अमेरिकन लष्करी तळ तसेच आखाती प्रदेशातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, अमेरिकन लष्कराने इराणशी संबंधित काही धोरणात्मक ठिकाणांवर कारवाई केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या संघर्षाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लेबनॉनमध्येही इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष सुरूच असून दोन्ही बाजूंनी हवाई आणि ड्रोन हल्ल्यांचे सत्र कायम आहे. या वाढत्या तणावामुळे संपूर्ण पश्चिम आशिया पुन्हा एकदा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.