मोठा 'राजकीय ट्विस्ट' मविआ उमेदवाराची माघार

महायुतीचा मार्ग मोकळा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
रत्नागिरी,
Konkan Legislative Council election कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मोठे राजकीय नाट्य घडले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्या मध्यस्थीनंतर ही घडामोड घडल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माने यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे कोकणातील महायुतीच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.
 
 
Konkan Legislative Council election
महाविकास आघाडीच्या Konkan Legislative Council election  वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडींना वेग आला. मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांच्याशी संवाद साधल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलली. त्यानंतर राणे स्वतः माने यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि माने यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतला.
 
 
अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवादावर भाष्य केले. उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असलेल्या सूचकांच्या स्वाक्षऱ्या मिळवताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा आरोप त्यांनी केला. पक्षातील सहकाऱ्यांकडून पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
याशिवाय, निवडणुकीत संभाव्य Konkan Legislative Council election  घोडेबाजार टाळण्याच्या उद्देशानेही आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे माने यांनी सांगितले. काही मतदार तीर्थयात्रेसाठी बाहेर गेल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत निवडणूक लढवणे अवघड ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे यांनी आपण महायुतीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणूनच या प्रक्रियेत सहभागी झाल्याचे सांगितले. बाळ माने हे अनुभवी राजकारणी असून त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले. राज्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अनेकांचा विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला.माने यांनी महायुतीच्या नेत्यांच्या शब्दाचा मान राखला असून, परिस्थितीचे वास्तव आकलन करून त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे राणे यांनी सांगितले. या घडामोडीमुळे कोकणातील विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजू अधिक भक्कम झाल्याचे मानले जात असून, महाविकास आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.