नागपूर,
kumar-ashirwad : पारशिवनी तालुक्यातील भागीमारी गटग्रामपंचायतीच्या मुक्कामी भेटीदरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी एका दिव्यांग व्यक्तीने ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या लाभांबाबत तक्रार मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित खर्चाची पडताळणी करण्याचे आदेश दिले.
गावातील धर्मराज भारसाखरे या दिव्यांग युवकाने ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कुमार आशीर्वाद यांनी भागीमारी ग्रामपंचायतीने मागील तीन वर्षांत दिव्यांगांच्या कल्याणासाठी किती निधी खर्च केला, तसेच किती दिव्यांग लाभार्थ्यांना मदत करण्यात आली याची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भातील अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ग्रामपंचायती या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या संस्था असल्याचे सांगितले. ग्रामसभेला गावाच्या गरजा निश्चित करण्याचा अधिकार असून समाजातील वंचित आणि दिव्यांग घटकांच्या विकासासाठीही ग्रामपंचायतींनी अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांगांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना असल्याने या बाबतीत अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
भागीमारी भेटीपूर्वी कन्हान येथील नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि आपदा मित्र यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेतली. पारशिवनी तालुक्यातील आठ गावे पूरप्रवण क्षेत्रात येत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर त्यांनी बोर्डा गणेशी येथील अंतरंग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलची पाहणी केली. तसेच परिसरातील पाणंद रस्त्यांचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. या दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार सुरेश वाघचौरे, गटविकास अधिकारी सुभाष जाधव आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.