अमृतकाळ हा भारतीय युवांसाठी सुवर्णसंधी

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
- कुमार मंगलम बिर्ला यांचे प्रतिपादन
- राष्ट्रनिर्माणासाठी युवा शक्तीने पुढे यावे
- रा. स्व. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन
 
नागपूर, 
भारत सध्याच्या ‘अमृतकाळा’त विकसित राष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. हा काळ भारतीय युवांसाठी अभूतपूर्व संधी घेऊन आला आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत देशाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित Kumar Mangalam Birla कुमार मंगलम बिर्ला यांनी युवकांना केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग मैदानावर आयोजित या वर्गात देशभरातील सुमारे 880 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
 

birala 
 
युवकांना संबोधित करताना बिर्ला म्हणाले, गेली दोन दशके भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. तंत्रज्ञान, उद्योग आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात झालेल्या वेगवान प्रगतीमुळे भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने दमदार पावले टाकत आहे. आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या संधी पूर्वी कधीच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे युवा शक्तीने या काळाचे महत्त्व ओळखून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.
 
 
यावेळी त्यांनी संघाच्या कार्याचीही प्रशंसा केली. ‘सरसंघचालकांची प्रत्येक भेट मला नवी ऊर्जा देऊन जाते. राष्ट्रहितासाठीचे त्यांचे समर्पण प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहे, असे ते म्हणाले. भारताच्या विकासाचा उल्लेख करताना Kumar Mangalam Birla  बिर्ला यांनी सांगितले की, कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत उद्योगांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र औद्योगिक विकासाच्या वाटचालीत भारतीय संस्कार आणि मूल्ये विसरून चालणार नाहीत. गेल्या शतकभरापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात याच मूल्यांची जपणूक आणि रुजवण करीत आहे. भारतीय संस्कृतीच्या भक्कम पायावर उभा राहून देश आधुनिकतेकडे झेपावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्व काही भारतासाठीच करा
आत्मनिर्भर भारत ही केवळ संकल्पना नसून, देशाची मोठी ताकद असल्याचे सांगताना बिर्ला म्हणाले, युवकांनी संशोधन, नवोन्मेष किंवा उत्पादन करताना भारतासचा विचार करावा. भारतात राहून भारतासाठी आणि भारतातूनच जगासाठी काम करण्याची वृत्ती जोपासली, तर देशाच्या आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळेल.
दशकभरात शतकभराची झेप
गेल्या दहा वर्षांत भारताने अनेक क्षेत्रांत शतकभराची प्रगती साधल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, आज संपूर्ण जग भारताकडे आशेने आणि विश्वासाने पाहत आहे. विविध आंतरराष्ट्रीय तज्ज्ञही भारताच्या विकासगाथेची दखल घेत असून येत्या काळात विकसित भारत जगासमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.