वणीच्या नगरसेवकाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ,
Local Authorities Constituency Election यवतमाळ जिल्हा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वणी नगर परिषदेचे नगरसेवक अजय पांडुरंग धोबे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात धोबे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीने नामांकन मागे घेण्यामागे कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन, धमकी अथवा अन्य अनुचित हस्तक्षेप झाला असल्याची गंभीर शंका व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा अधिकार असून, कोणत्याही दबावाखाली उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले गेले असल्यास तो प्रकार लोकशाही मूल्यांवर आघात करणारा असल्याचे निवेदनात नमूद म्हटले आहे.
Local Authorities Constituency Election तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, नि:पक्ष व पारदर्शक राहण्यासाठी संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार, प्रलोभन अथवा बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगत मतदारांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मारेगाव नगर पंचायत अध्यक्ष डॉ. मनीष मस्की, आशिष रिंगोले व रवींद्र कांबळे हेही उपस्थित होते.