आमगाव स्थानकावर गांजासह तस्कर अटकेत

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
- ऑपरेशन नार्कोस अंतर्गत आरपीएफची कारवाई

गोंदिया, 
Marijuana Smuggler Arrested दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) तर्फे ऑपरेशन नार्कोस अंतर्गत मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून गांजाची वाहतूक करणार्‍या एका तस्कराला एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा गांजासह मंगळवारी 2 जून रोजी आमगाव रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. शीतल चींधालोरे, रा. धानोली, ता. आमगाव, जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
ganja
 
Marijuana Smuggler Arrested  मंडल सुरक्षा आयुक्त चेतन दिलीपराव जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ नागपूरकडून राज्य पोलिस व इतर कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या समन्वयाने रेल्वेमार्गे होणार्‍या मादक पदार्थ, मद्य व तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 2 जून 2026 रोजी आमगाव रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले प्रधान आरक्षक राजेश कुमार यांनी गाडी क्रमांक 12994 पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आल्यानंतर जनरल डब्यातून एका संशयित व्यक्तीला प्लास्टिकची पिशवी घेऊन जाताना पाहिले. संशय आल्याने त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्या ताब्यातील पिशवीत 2.090 किलो मिळून आला. सदर गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किमत अंदाजे 1 लाख 4 हजार 500 रुपये इतकी आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी जीआरपी गोंदिया यांच्या ताब्यात देण्यात आले. जीआरपीतर्फे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.