हिंगणघाट,
mobile phone stolen शहरात सध्या मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेत आणि विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी नागरिकांच्या खिशातील मोबाईल क्षणार्धात गायब होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी एका पोलिस कर्मचार्याचाच मोबाईल लंपास केल्याने मोबाईल चोर पोलिसांवर वरचढ झाल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात कोट्यवधींचा खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेर्यांच्या माध्यमातून पोलिसांना तपासात मदत होऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे या यंत्रणेच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सीसीटीव्हीचे जाळे असतानाही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यत होत आहे.
mobile phone stolen डिजिटल युगात मोबाईलमध्ये बँकिंग अॅप्स, वैयतिक कागदपत्रे, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, फोटो आणि इतर संवेदनशील माहिती साठवलेली असते. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यानंतर नागरिकांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक फटका देखील सहन करावा लागत आहे. जेव्हा पोलिस कर्मचार्याचाच मोबाईल सुरक्षित नाही, तेव्हा आमच्या सुरक्षिततेचे काय? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम आखून या टोळीचा तातडीने पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.