बुलंदशहर,
Namazpathan Hanuman Temple उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील औरंगाबाद परिसरात एका हनुमान मंदिराच्या आवारात नमाज अदा केल्याच्या घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, ओलिना गावात एका घराचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी बाहेरील गावातील काही मजूर काम करत होते. दुपारच्या विश्रांतीच्या वेळी काही कामगार जेवणासाठी गेले असताना एक कामगार जवळील हनुमान मंदिराच्या परिसरात गेला. त्यावेळी त्याने तेथे नमाज अदा केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेदरम्यान त्याचा आणखी एक सहकारीही तेथे उपस्थित होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केला. व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात चर्चा सुरू झाली आणि काही नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदवला. परिस्थितीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस तपासात या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रार्थनास्थळाच्या वापराबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात नमाज अदा करणारा व्यक्ती, त्याचा सहकारी तसेच बांधकामाशी संबंधित आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा सखोल तपास सुरू असून व्हिडिओची सत्यता, संपूर्ण परिस्थिती आणि संबंधितांच्या भूमिकेची पडताळणी केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.