न्यूझीलंडमध्ये रंगणार भारताचा मेगा दौरा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ndia's Mega Tour in New Zealand भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या उत्तरार्धात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये सर्वच प्रकारच्या क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आगामी घरच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी-20, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. सामन्यांच्या संख्येच्या दृष्टीने हा न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठ्या दौऱ्यांपैकी एक मानला जात आहे.दौऱ्याची सुरुवात ऑक्टोबरच्या अखेरीस टी-20 मालिकेने होणार असून त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळवले जातील. विशेष म्हणजे, एकदिवसीय मालिकेत चाहत्यांना Rohit Sharma आणि Virat Kohli यांना पुन्हा एकत्र मैदानात पाहण्याची संधी मिळू शकते. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचा महत्त्वाचा भाग आहेत.
 
 
रोहित-विराट
 
आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. संघ संयोजन, खेळाडूंचा फॉर्म आणि रणनीती तपासण्यासाठी या सामन्यांचा मोठा उपयोग होणार आहे. भारतीय संघ जवळपास सहा वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांमध्ये झालेल्या कसोटी लढतींनी मोठी उत्सुकता निर्माण केली होती. त्यामुळे वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांकडे क्रिकेटविश्वाचे विशेष लक्ष असणार आहे.अलीकडच्या काळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. त्यामुळे आगामी दौऱ्यातही चाहत्यांना उच्च दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. टी-20 मधील आक्रमक खेळ, वनडेमधील संतुलित लढत आणि कसोटीतील रणनीतीपूर्ण संघर्ष यामुळे हा दौरा वर्षातील सर्वात चर्चेचा क्रिकेट कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे.