दोन आठवड्यांनी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे खळबळ; राहुल गांधींचीही उडी
अनिल कांबळे
नागपूर
NEET re-exams वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून नीटची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय आकांक्षा चतुर्वेदी हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्येनंतर तब्बल दोन आठवड्यांनी समोर आलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये आकांक्षाने नीटची फेरपरीक्षा द्यावी लागण्याच्या भीतीचा उल्लेख केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूमागे परीक्षेचा तणाव कारणीभूत होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्याची रहिवासी असलेली आकांक्षा नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजय नगर परिसरात राहून नीट परीक्षेची तयारी करत होती. २० मे रोजी ती राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यावेळी घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. कुटुंबीयांनाही हा निर्णय वैयक्तिक तणावातून घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र अंत्यसंस्कारानंतर मूळ गावी परतलेल्या चतुर्वेदी कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी आकांक्षाच्या पुस्तकांच्या एका वहीत हस्तलिखित चिठ्ठी सापडल्याचा दावा करण्यात आला. ही चिठ्ठी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रकरणाने अचानक वेगळे वळण घेतले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुसाईड नोटमध्ये आकांक्षाने ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा अत्यंत चांगली गेली होती आणि परीक्षेत तिला ६५० पेक्षा अधिक गुण मिळेल असा पूर्ण विश्वास होता, असे नमूद केले आहे. मात्र नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे फेरपरीक्षेची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नसल्याचेही तिने आई-वडिलांना उद्देशून लिहिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आत्महत्येनंतर एवढ्या दिवसांनी सुसाईड नोट समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नोट आधी का सापडली नाही? ती खरोखर आकांक्षानेच लिहिली होती का? तिचा मृत्यू आणि नोटमधील मजकूर यांचा थेट संबंध आहे का? या सर्व बाबींची चौकशी आता तपास यंत्रणांना करावी लागणार आहे. आकांक्षाचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून,नागपूर येथे स्वयंपाकाचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले असून,कर्ज फेडण्याच्या चिंतेत होते. असे सांगण्यात येते.
NEET re-exams नागपूर पोलिसांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. आत्महत्येनंतर जवळपास दोन आठवड्यांनी समोर आलेल्या या सुसाईड नोटची सत्यता, हस्ताक्षरांची पडताळणी आणि इतर तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच कोणताही निष्कर्ष काढला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सदर सुसाईड नोट घटनेच्या दिवशी का मिळाली नाही? पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले का?असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सध्या तरी आकांक्षाच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र एका महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे स्पर्धा परीक्षांभोवती निर्माण होणारा मानसिक ताण, परीक्षांबाबतचा अनिश्चिततेचा माहोल आणि त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.