मुंबई
Pahlaj Nihalani सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताला त्यांचे कौटुंबिक मित्र शशी रंजन यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
पहलाज निहलानी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक परिचित आणि प्रभावी नाव होते. त्यांनी 1982 मध्ये ‘हथकडी’ या चित्रपटाची निर्मिती करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘गुनाहों का फैसला’, ‘पाप की दुनिया’, ‘मिट्टी और सोना’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आंखे’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. यापैकी ‘आंखे’ हा 1990 च्या दशकातील सर्वात मोठ्या व्यावसायिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता.निहलानी यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांच्या चित्रपटांतून गोविंदा आणि चंकी पांडे यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे ते लोकप्रिय झाले. चित्रपट निर्मितीसोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही हात आजमावला. 2012 मध्ये त्यांनी ‘अवतार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच 2008 मध्ये ‘हल्लाबोल’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता.
पहलाज निहलानी हे Pahlaj Nihalani केवळ निर्माते म्हणूनच नव्हे तर त्यांच्या ठाम आणि बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जात होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ हे प्रचारगीत तयार केल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात सेन्सॉरशिपच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांमुळे आणि अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे ते सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.त्याआधी ते ‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’चे तब्बल 29 वर्षे अध्यक्ष होते. 2009 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. 2017 मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात असून, भारतीय मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या योगदानाची आठवण काढली जात आहे