संयुक्त राष्ट्र,
Pakistan Out of UN Security Council संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाले आहेत. यामध्ये किर्गिझस्तानने इतिहास रचत प्रथमच सुरक्षा परिषदेवर स्थान मिळवले आहे. याशिवाय ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच झिम्बाब्वे यांचीही अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या सुरक्षा परिषदेवर असलेल्या काही देशांचा कार्यकाळ येत्या वर्षाच्या अखेरीस संपणार असून त्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तानसह पनामा, डेन्मार्क, ग्रीस आणि सोमालिया हे देश आपला कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्या जागी नव्याने निवडून आलेले देश १ जानेवारी २०२७ पासून सदस्य म्हणून कामकाज सुरू करतील. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे.
सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदासाठी संयुक्त राष्ट्र महासभेतील मतदानात उमेदवार देशाला दोन-तृतीयांश बहुमत मिळवणे आवश्यक असते. यंदाच्या निवडणुकीत पाच जागांसाठी सात देश रिंगणात होते. पहिल्याच फेरीत चार देशांची निवड निश्चित झाली, तर उर्वरित जागेसाठी अनेक फेऱ्यांमध्ये मतदान झाले. अखेरीस किर्गिझस्तानने प्रतिस्पर्धी देशाला मागे टाकत ही जागा मिळवली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात प्रभावशाली संस्था मानली जाते. जागतिक शांतता आणि सुरक्षा राखणे, संघर्षांवर तोडगा काढणे, निर्बंध लागू करणे आणि काही परिस्थितींमध्ये लष्करी कारवाईला मान्यता देणे यांसारखे महत्त्वाचे अधिकार या परिषदेकडे आहेत.
सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यापैकी अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन हे पाच स्थायी सदस्य असून त्यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. उर्वरित दहा सदस्य अस्थायी असतात आणि त्यांची निवड भौगोलिक प्रतिनिधित्वाच्या आधारावर केली जाते. दरवर्षी पाच नवीन देशांची निवड होत असल्याने परिषदेत विविध देशांना जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते.